राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विविध विषयावर भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अनेकवेळा राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षावर जोरदार टीका केली आहे. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना अनेकवेळा दिसून आले आहे. त्यातच आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर काँग्रेसच्या मंत्र्यांविरोधात थेट काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींकडे तक्रार करणार आहेत.
तुमचे मंत्री सत्तेसाठी लाचार असून काका-पुतण्यांपुढे माना डोलावत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं.
गोपीचंद पडळकर यांनी मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना हे वक्तव्य केले आहे. काँग्रेसचे मंत्री लाचार आहेत सत्तेचे वेसन बांधल्या गेल्याने हे लाचार मंत्री काका-पुतण्यापुढे फक्त माना डोलावण्याचं काम करत आहेत. तुमचे मंत्री फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारानं किती काम करतात हे मी सोनिया गांधींना कळवणार आहे, असं पडळकर म्हणाले.
पुढे बोलताना पडळकर म्हणाले की, या सरकारला मराठा आरक्षणाविषयी, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविषयी व पदोन्नतीतील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात कुठलेही पाऊल उचलण्याची घाई नाहीये. पण न्यायालयाच्या निर्णयाआधीच आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याची लगबग उडाली आहे. यावरून या सरकारची मानसिकता दिसून येते, अशी टीकाही त्यांनी केली आहे.