मुंबई | स्वबळाची नारा देणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी दर्शवली आहे. मंगळवारी शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांची सिल्वर ओक वर बैठक झाली. यावेळी त्यांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
शरद पवार म्हणाले की, तुम्ही वेगळेच लढणार असाल तर आधीच सांगा. आम्हालाही तयारीला लागता येईल असं ते म्हणाले. जर दिल्लीवरून ठरलं असेल तर आम्हाला काही अडचण नाही किंवा नाना पटोलेंना अधिकार दिले असतील तर तसंही सांगा, असं शरद पवार म्हणाले असल्याची माहिती आहे.
पवार म्हणाले की, पक्ष वाढवण्यासंदर्भात कोणाच्याही मनात दुमत नाही पण सोबत असलेल्या पक्षांना दुखावणे योग्य नाही, अशा शब्दात पवार यांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती आहे. शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकीला नाना पटोले मात्र गैरहजर होते. मात्र यावर आता नाना पटोले काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागणार आहे.