सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सण आणि उत्सवावर राज्य सरकारने बंदी घातलेली आहे. मात्र हाच नियम पायदळी तुडवताना राजकीय पक्षाचे नेते अनेकवेळा दिसून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर गर्दी करणाऱ्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाचे नियम नाहीत का? असा सवाल ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. तसेच शरद पवारांना अटक करा, अन्यथा आम्ही उच्च न्यायालयात धाव घेऊ, असा इशारा सदावर्ते यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना दिला आहे.
प्रकरण असे की, पुणे जिल्ह्यातील मंचर येथे स्वर्गीय खासदार किसनराव बाणखेले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह अन्य आजी-माजी आमदार उपस्थित होते. या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. तसेच कोरोनाचे नियम पायदळी तुडवण्यात आले होते
या गर्दीवरुन गुणरत्न सदावर्ते यांनी थेट शरद पवार यांना अटक करण्याची मागणी केली आहे. “शरद पवार, दिलीप वळसे पाटील यांच्यासाठी कोव्हिड नियम नाही का? राजकारणासाठी लोकांना एकत्र आणणे, लोकांना वेठीस धरणे हे भारतीय संविधानाच्या आर्टिकल २१ ला अभिप्रेत नाही. शरद पवार, दिलीप वळसे पाटील तुम्ही कायद्यापेक्षा मोठे नाही. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता मला तुम्हाला सांगायचं आहे, शरद पवार यांना अटक करा, नाहीतर आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करु आणि आम्ही तशी तक्रार केली आहे” असं सदावर्ते म्हणाले.