देशात कोरोनच्या संसर्गामुळे झपाट्याने रुग्णसंख्या वाढत असताना कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणावर करोनाची रुग्णसंख्या वाढली होती. ताईच अनेकांना आपला प्राणही गमवावा लागला होता. या दुसऱ्या लाटेत कुंभमेळ्यासारख्या गर्दी होणाऱ्या सोहळ्याचे आयोजन करणं चूक असल्याचा आक्षेप अनेकांनी घेतला होता. आता उत्तराखंड उच्च न्यायालयानेच या मुद्द्यांवरून उत्तराखंड सरकारला चांगलेच झापले आहे.
‘आधी आपण कुंभमेळ्याची चूक केली, आता चारधाम यात्रा. आपण वारंवार स्वत:च खजील होण्यासारख्या गोष्टी का करत आहोत?’ अशा शब्दांत राज्य सरकारला सुनावतानाच ‘तुम्ही कोर्टाला फसवू शकता, पण लोकांना नाही. हेलिकॉप्टर घ्या, जा आणि बघा केदारनाथ-बद्रीनाथला काय सुरू आहे’, अशा कठोर शब्दांत उच्च न्यायालयानं उत्तराखंड सरकारच्या धोरणावर ताशेरे ओढले आहेत.
उच्च न्यायालयाने उत्तराखंड सरकारने या सगळ्या प्रकारावर कानाडोळा केला असल्याचे म्हटले आहे. आधी आपण कुंभमेळ्याची चूक केली. आता चारधाम यात्रा सुरू आहे. राज्य सरकारचं या सगळ्याकडे दुर्लक्ष सुरू आहे. जा आणि बघा काय घडतंय. केदारनाथ आणि बद्रीनाथ मंदिरांमधल्या व्हिडिओमध्ये साधू कोणतेही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळताना दिसत नाहीयेत. प्रार्थना करण्यासाठी का असेना, पण तुम्ही २३ साधूंना एकाच वेळी मंदिरात प्रवेश नाही देऊ शकत. हेलिकॉप्टर घ्या आणि जाऊन बघा काय घडतंय बद्रीनाथ-केदारनाथमध्ये’, अशा शब्दांत न्यायालयाने सरकारला फटकारले.