सध्या राज्यात मनसुख हिरेन प्रकरण, परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यावर लावलेले आरोप यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात विरोधकांनी सातत्याने पत्रकार परिषद घेऊन आघाडीच्या अडचणी वाढवण्याचे काम केले आहे. त्यात या टीकांवर आता काँग्रेसनेही पलटवार करत भाजपावर निशाणा साधला आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मागणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आधी पोलिसांची खाती बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती याचे उत्तर द्यावं, अशी टीका मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाजी जगताप यांनी केली होती, आता या टीकेला अमृता फडणवीसांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

अमृता फडणवीस आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, . ए भाई , तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यात तुम्ही ‘UTI बैंक / Axis बँके ‘ ला योग्यता पाहून दिली होती. लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय, असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे.
अमृता फडणवीस या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आघाडीतील पक्षांवर सातत्याने टीका करत असतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही थेट टीका करायला त्या मागेपुढे पाहत नाहीत. मात्र, त्यांच्या आताच्या ट्विटमधील भाषा नेहमीपेक्षा खूपच आक्रमक आहे. या टीकेला आता आक्रमक भाई जगताप काय उत्तर देतात हे पाहावे लागणार आहे.