कर्नाटकात सुरू झालेला हिजाब वाद आता देशभऱात पसरू लागला आहे. देशभरातून या वादावर पडसाद उमटले जात आहेत. यातच आता काँग्रेसचे नेते जमीर अहमद यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याचे चिन्ह दिसून येत आहे. ‘महिला हिजाब घालत नाही म्हणून बलात्कार होतात’, असा अजब तर्क जमीर अहमद यांनी लावला आहे.
जमीर अहमद यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे वादग्रस्त वक्तव्य केलं. ‘हिजाब म्हणजे इस्लाममध्ये पर्दा. महिलेचे सौंदर्य लपविण्यासाठी हा पर्दा असतो. महिला जेव्हा हिजाब घालत नाही तेव्हा त्यांचा बलात्कार होतो. हिजाब महिलांचे सौंदर्य लपवतो. आज हिंदुस्थानात बलात्काराचे प्रमाण जास्त आहे. कारण महिला आता हिजाबमध्ये राहत नाही’, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
दरम्यान, हिजाब विवादामुळे कर्नाटक सरकारने कनिष्ठ महाविद्यालयांच्या सुट्ट्या 15 फेब्रुवारीपर्यंत वाढवल्या आहेत. वाढत्या वादामुळे राज्य सरकारने 9 फेब्रुवारीपासून महाविद्यालयं बंद करण्याचे आदेश दिले होते आणि ही मुदत 14 फेब्रुवारीपर्यंत होती. या शिवाय सरकारने 16 फेब्रुवारीपर्यंत पदवी आणि डिप्लोमा महाविद्यालयांनाही बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी हा बंदचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्य प्रशासनाने दिली आहे.