राज्यात किराणा मालाच्या दुकानात वाईन विक्रीला परवानगी दिल्यानंतर राज्य सरकार आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार शीतयुद्ध पेटले होते. अशातच या निर्णयाला रास्तवराडीच्या महिला नेत्या आणि महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी साकारतां पाठिंबा दर्शवला आहे.
राज्य सरकारचे वाईन विक्रीचं धोरण हे आर्थिकदृष्ट्या योग्य आहे, आणि अद्यापही महिला आयोगाकडे या वाईन विक्रीसंदर्भात कोणत्याही तक्रारी आलेल्या नाहीत. तसेच अशा प्रकारे वाईन विक्री करू नये, अशी मागणीदेखील राज्य महिला आयोगाकडे आलेली नाही, अशा शब्दात राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.
रूपाली चाकणकर या ‘राज्य महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत जनसुनावणी घेण्यासाठी मंगळवारी जळगाव जिल्ह्यात आल्या होत्या. त्यांनी यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातच पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्यांनी सांगितले की, कोरोनाच्या काळात राज्यात बालविवाह मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. एकट्या सोलापूर जिल्ह्यात १ हजारपेक्षा जास्त बालविवाह झाले आहेत. जळगाव जिल्ह्यातदेखील ४० बालविवाह रोखले गेले आहेत.
मात्र राज्यात अनेक ठिकाणी बालविवाहांची संख्या खूपच जास्त आहे. तसेच काही ठिकाणी नोंदणी अधिकाऱ्यांनी मुलींचे वय जास्त दाखवले आहे. अशा वाढत्या बालविवाहाच्या घटनांमुळे महाराष्ट्र २० ते २५ वर्षे मागे गेला आहे. त्यामुळे कुठेही बालविवाह होत असेल, तर त्याला उपस्थित राहणारे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचे सदस्यत्व रद्द करावे, तसेच नोंदणी अधिकारी चुकीचे जास्त वय नोंदवत असतील, तर त्यांच्यावर कारवाई करावी, यासाठी महिला आयोगाने मागणी केली असल्याचेही चाकणकर यांनी सांगितले.