मुंबई | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी पत्रकारांसमोर नारा दिला, ‘जय बांगला, जय मराठा!’ प. बंगालच्या वाघिणीची ही गर्जना भविष्यातील राजकारणाची नांदी आहे, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.
मुंबईत येऊन त्यांना उद्धव ठाकरे यांना भेटायचे होते. ती भेट मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आजारपणामुळे झाली नाही. ममता बॅनर्जी यांनी प. बंगालात जो ‘खेला होबे’ केला, दिल्लीचा अतिरेक रोखण्याचा, तोच खेळ महाराष्ट्रात झाला. सत्ता, पैसा व केंद्रीय तपास यंत्रणांचा प्रचंड दहशतवाद याचा पराभव प. बंगाल आणि महाराष्ट्राने केला. त्यामुळे ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा होता. एका राज्याचे मुख्यमंत्री दुसऱ्या राज्याच्या दौऱ्यावर जातात तेव्हा फार स्वागत होत नाही.
ममता बॅनर्जी त्यास अपवाद आहेत. प. बंगालातून जणू बहीणच दोन दिवसांसाठी पाहुणचारास आली, असे मुंबईकरांना वाटले, असे राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरातून ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्याचं कौतुक केलं. महाराष्ट्र मंडळात आमच्या नियमित बैठका होत असतात. प. बंगालचे महाराष्ट्राशी नाते कायम टिकले पाहिजे!” असा आशावाद ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला.