सध्या राज्यात आघाडीचे साकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरु झालेली पाहायला मिळत आहे, त्यातच खासदार खासदार रामदास तडस यांची सून पूजा हिचा व्हिडीओ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट केला होता. त्यात तडस यांच्या सुनेनं आपल्यावर कुटुंबाकडून अन्याय होत असल्याचा आरोप केला होता. तसंच चाकणकर यांच्याकडे मदतीची मागणी केली होती.
पूजा तडस यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तडस यांनी या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचं स्पष्ट केलं होतं. यानंतर संध्याकाळच्या सुमारास पंकज तडस आणि पूजा यांचा विवाह पार पडला आहे. आपण यापूर्वीही पूजाला स्वीकारलेलं होतं आणि आताही स्वीकारतो आहे. पूजाशी मी लग्न केलं होतं. पण आता त्यांच्या इच्छेनुसार वैदिक पद्धतीनं लग्न केलं आहे. या प्रकरणात काही लोकांनी राजकीय सुपारी घेतली होती तो प्रश्न आता मिटला आहे, असं पंकज तडस यांनी म्हटलं आहे. याला चाकणकरांनी उत्तर देत भाजपवर टीका केली आहे.
कोणतीही मुलगी स्वत:चा संसार किंवा स्वत:चं वैयक्तिक आयुष्य कधीच चव्हाट्यावर आणत नाही. तिने वर्धा पोलिसात तक्रार दाखल केली होती. केवळ राजकीय दबावामुळे कारवाई झाली नाही. म्हणून नागपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याची कॉपी माझ्याकडे आहे. त्यांच्या सर्व तक्रारी माझ्याकडे आहेत. विवाह प्रमाणपत्रंही माझ्याकडे आहे. तिला खूप त्रास होत होता म्हणून तिने व्हिडीओतून आपली वेदना मांडली. त्यामुळे त्यांना विवाह करावा लागतोय, असं चाकणकर म्हणाल्या.