मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि विद्यमान होमगार्ड महासंचालक परमवीर सिंग यांनी पाठविलेले हे काही पहिले पत्र नाही. रश्मी शुक्ला यांच्या तपासानंतर तत्कालिन पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी जो अहवाल सरकारकडे सादर केला, त्याची माहिती जनतेला द्या, म्हणजे संपूर्ण प्रकार उघडकीस येईल, असा नवा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे केला.
ते म्हणाले की, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी काल एक पत्र लिहिले आहे. पण, अशाप्रकारचे हे पहिले पत्र नाही. यापूर्वी तत्कालिन पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी एक अहवाल राज्य सरकारला सादर केला होता. तेव्हाच्या आयुक्त, गुप्तवार्ता यांच्याकडून हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे गेला होता आणि त्यांच्याकडून तो गृहमंत्र्यांकडे गेला. मुळात सुबोध जयस्वाल यांच्यासारखा प्रामाणिक अधिकारी पोलिस महासंचालकासारखे प्रतिष्ठेचे पद सोडण्याचे काहीच कारण नव्हते. पण, रश्मी शुक्ला यांनी दिलेल्या अहवालावर हे सरकार कोणतीही कारवाई करू इच्छित नव्हते आणि नेमक्या त्या दूरध्वनी संवादातीलच नावे बदल्यांच्या फाईलमध्ये आलेली होती. भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करण्याबाबत शासन अजीबात गंभीर नव्हते. त्यामुळे एकेक करीत वरिष्ठ अधिकारी प्रतिनियुक्तीवर केंद्रात गेले आसा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
परमवीर सिंग यांच्या अध्यक्षतेतील कमिटीने वाझे यांना नोकरीत घेतले, असे शरद पवार सांगत असले तरी मुख्यमंत्र्यांच्या तसेच गृहमंत्र्यांच्या निर्देशाने, आशीर्वादाने त्यांनी हे काम केले, हे सांगायला मात्र पवार विसरले. परमवीरसिंग यांच्या पत्रात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांना माहिती दिल्याचे (ब्रिफिंग) सांगितले आहे. मग याप्रकरणी मुख्यमंत्री का बोलत नाहीत? ते का गप्प आहेत. असे करून परमवीरसिंग यांच्या पत्राकडे दुर्लक्ष करणार असाल तर ते पापांवर पांघरूण घालण्यासारखे आहे. गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय, याची चौकशी होऊच शकत नाही. खरे तर गृहखाते कोण चालविते? अनिल देशमुख की अनिल परब, हाच प्रश्न निर्माण झाला आहे.
सचिन वाझे जितक्या गाड्या वापरत होते, त्यापैकी काही गाड्या गेल्या पाच ते सहा महिन्यात नेमके कोण-कोण व्यक्ती वापरत होते, हेही स्पष्ट झाले पाहिजे. एनआयए किंवा अन्य तपास यंत्रणांनी याची माहिती जनतेला दिली पाहिजे, अशी मागणी फडणवीसांनी केली होती