बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग परिसीमा बदलाचा मुंबई भाजप तीव्र निषेध व्यक्त करत आहे. या संदर्भात मुंबई भाजपा शिष्टमंडळानी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त श्री यू. पी. एस. मदान यांची भेट घेतली. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबईसह पश्चिम उपनगरातील प्रभाग परिसीमा बदलात सत्ताधारी पक्षाला फायदा व्हावा यासाठी हा प्रकार करण्यात येत असल्याचे राज्य निवडणूक आयुक्तांना सांगितले, असे मुंबई अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.
मंगलजी म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेने २४ ऑक्टोबर २०२१ रोजी दिलेल्या निवेदनात सादर केलेली परिसीमा बदलाची माहिती आणि २६ ऑक्टोबर २०२१ रोजी राज्य निवडणूक आयोगाला सादर केलेले प्रभाग परिसीमा बदल यात तफावत आहे. यामुळे केवळ सत्ताधारी पक्षांचा फायदा होत असल्याचे चित्र समोर येत असल्याची शंका मंगलजी यांनी त्यावेळी व्यक्त केली. त्यावर बोलताना पुढे ते म्हणाले की, विधानसभेतील विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली होती. एका कॅबिनेट मंत्र्याच्या देखरेखीखाली प्रभागाच्या परिसीमेमध्ये अफारातफर केली जात असल्याची टिका मंगलजी यांनी केली.
मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार श्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त श्री यू. पी. एस. मदान यांची भेट घेतली आणि यावर आवश्यक ती कारवार्ई करावी अशी मागणी केली. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभागाच्या परिसीमा बदल पारदर्शकतेने व्हावेत अशीही मागणी देखील या शिष्टमंडळाने केली.