शिवसैनिकांची नोंदणी हा पक्षाचा आत्मा असून शिवसंपर्क अभियानातून याला गती मिळाली आहे. आता यापुढे गाव तिथे शाखा, गाव तिथे शाखेचा बोर्ड आणि गाव तिथे शिवसैनिक यावर भर देण्याचे आवाहन शिवसेना उपनेते तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते धरणगावात शिवसंपर्क अभियानाच्या कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्र्यांनी भारतीय जनता पक्षावर घणाघाती टीका केली. तर याच प्रसंगी शहरातील कोट्यवधी रुपयांची विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपुजन करण्यात आले.
याबाबत वृत्त असे की, आज सकाळी धरणगाव येथे शिवसंपर्क अभियानाच्या अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे महिला आघाडी जिल्हा संघटक महानंदा ताई पाटील तालुकाप्रमुख गजानन पाटील ,विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर , नगराध्यक्ष निलेश चौधरी , यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. यात प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते चोपडा रस्त्यापर्यंत दुभाजकांसह तीन प्रवेशद्वारांचे एकूण साडे 3 कोटी ५० लक्ष रूपयांच्या कामांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच शहरात अतिशय अद्ययावत असे ८० लाख रूपये खर्चून बांधण्यात आलेल्या शौचालयाचेही लोकार्पण करण्यात आले.
धरणगाव शहरात याच प्रकारातील सात शौचालये बांधण्यात येणार आहेत. या प्रकारचे उत्तर महाराष्ट्रातील हे पहिलेच शौचालय आहे हे विशेष. यासोबत व्हाईट हाऊस जवळच्या मंदिराजवळ सहा लाख रूपयांचे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले असून याचेही या कार्यक्रमात लोकार्पण करण्यात आले.
