बिहारच्या सुलतानगंजमध्ये बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला होता. 29 एप्रिल रोजी आलेल्या वादळादरम्यान हा पूल पडला होता. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. हा पूल का पडला अशी विचारणा केली असता केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना सनदी अधिकाऱ्याने विचित्र उत्तर दिले. जोरदार वारा आणि धुक्यामुळे हा पूल पडल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. त्याच्या या उत्तरामुळे गडकरींनी कपाळाला हात लावला.
एका कार्यक्रमात बोलत असताना नितीन गडकरी यांनी हा सगळा प्रकार जनतेला सांगितला. या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, ’29 एप्रिलला पूल पडला. मी माझ्या सचिवांना याचे कारण विचारले, त्यांनी मला सांगितले की सोसाट्याचा वारा आणि धुक्यामुळे पूल पडला’ अधिकाऱ्याच्या या उत्तरावर आश्चर्य व्यक्त करताना गडकरी म्हणाले की, ‘मला एक गोष्ट कळत नाही की हवा आणि धुक्यामुळे पूल कसा काय पडू शकतो ? काही तरी त्रुटी राहिली असेल, ज्यामुळे हा पूल पडला असेल.
पुढे नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमात बोलताना पुलासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले असण्याची शक्यता बोलून दाखवली. या पुलासाठी 1710 कोटी रुपयांचा खर्च येणार होता. इतका पैसा खर्च करून उभा करण्यात येणार पूल हा वाऱ्याचाही मुकाबला कसा करू शकत नाही असा प्रश्न गडकरींना पडला होता.