पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यात ममता बॅनर्जी यांची मुख्य लढत भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्षाबरोबर असणार आहे. त्यात एकीकडे पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून पक्ष कार्यालय आणि बड्या नेत्यांकडे अनेक इच्छुक उमेदवार आपले चप्पल झिजवत असताना दुसरीकडे मात्र भाजपाने न मागता पक्षाची उमेदवारी देऊन स्वतःची फजिती करून घेतली आहे.
प्रकरण असे की, भाजपाने गुरुवारी १५७ उमेदवारांची यादी जाहीर केली. यापैकी दोघांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. चौरंगी विधानसभा मतदारसंघातून भाजपाने दिवगंत खासदार सोमन मित्रा यांच्या पत्नी शिखा मित्रा यांना उमेदवारी दिली. त्यांनी आपलं नाव हे मर्जीशिवाय पक्षाने जाहीर केल्याचा दावा केला.
या घडलेल्या प्रकरणावरून तृणमुल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी गृमंत्री अमित शहा यांना योग्य गृहपाठ करून घेण्याचा सल्ला दिला आहे. ‘मी निवडणूक लढवणार नाही. माझ्या परवानगी शिवाय नावाची घोषणा केली आहे. मी भाजपामध्ये कधीही प्रवेश घेणार नाही. भाजपाच्या यादीत माझे नाव कसे आले हे मला माहिती नाही. मी काँग्रेसमध्ये आहे, आणि काँग्रेसलाच साथ देईन असे शिखा मित्रा यांनी स्पष्ट केले आहे.
भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनी शिखा आणि त्यांच्या मुलाची भेट घेतली होती. त्यानंतर त्याच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरु झाली होती. मात्र शिखा मित्रा यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.तसेच तृणमूल काँग्रेसच्या आमदार माला साहा यांचे पती तरुण साहा यांना भाजपाने काशीपूर-बेलगछिया मतदारसंघातून तिकीट दिले होते. त्यांनी देखील उमेदवारी नाकारली आहे.