नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी मोठं विधान केले होते. बांगालदेशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात मी सहभागी झालो होतो. माझ्या जीवनातील हे पहिलंच आंदोलन होतं तसेच यासाठी मी तुरुंगात देखील गेलो होतो असे मोदी यांनी म्हंटल होत.
दरम्यान मोदींच्या या विधानावरून विरोधकानी पुन्हा एकदा मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला आहे., काँग्रेसकडून थेट माहिती अधिकाराअंतर्गत पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या दाव्यासंदर्भात माहिती मागवण्यात आली आहे. त्यामुळे आता पंतप्रधान मोदी यांच्या विधानाची काँग्रेस पडताळणी करत आहे.
गुजरातमधील काँग्रेसचे सोशल मीडिया नॅशनल कनव्हेअर असणाऱ्या सरल पटेल यांनी माहितीच्या अधिकाराखाली RTI दाखल केला आहे. यासंदर्भातील माहिती पटेल यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून दिली आहे. नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशमध्ये केलेल्या दाव्यासंदर्भात माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज केल्याचे पटेल यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान कार्यालयाकडे मोदींनी बांगलादेश दौऱ्यादरम्यान केलेल्या दाव्यासंदर्भातील अधिक माहिती मागवणारा आरटीआय अर्ज केला. मला या संदर्भात जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे. कोणत्या कायद्याअंतर्गत मोदींनी अटक करण्यात आली. त्यांना कोणत्या तुरुंगात ठेवण्यात आले, हे मला जाणून घ्यायचे आहे. तुम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल ना?, असे ट्विट सरल पटेल यांनी केले आहे.