काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त विधान करून नवा वाद अंगावर घेतला होता तसेच या टीकेमुळे भाजपा पटोले विरोधात आक्रमक झालेली पाहायला मिळाली होती तसेच त्यांच्या विरोधात तक्रारी सुद्धा दाखल केल्या होत्या. आता पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांच्या टिकेनंतर पटोले यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
देशातील जनता अडचणीत असताना काँग्रेस कार्यकर्ते लोकांची मदत करत होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र देशाची संपत्ती विकत होते. त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही. ते स्वतःला देशाचे पंतप्रधान नाही तर भाजपचे प्रचारक समजतात अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी असंवेदनशीलतेच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. जगात कोरोनाचे रूग्ण मिळाले तेव्हा राहुल गांधी उपाययोजना करण्यास सांगत होते. तर, पंतप्रधान नमस्ते ट्रम्प करण्यात व्यस्त होते. पंतप्रधानांनी केलेल्या बेजबाबदार वर्तनामुळेच देशात कोरोनाचे रूग्ण वाढले असा आरोप पटोले यांनी केला.
मोदींच्या गुजरातमध्ये हे उत्तर भारतीय कामगार उपासमारीने त्रस्त होते. त्याचवेळी महाराष्ट्रात काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली. संकटात असणाऱ्या परप्रांतीय बांधवांची मदत करण्याचा मानवधर्म आम्ही निभावला, असे ते म्हणाले.