उदयगिरी महाविद्यालयात स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरीत शुक्रवारपासून साहित्य शारदेचा जागर होणार आहे. 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने येणाऱया पाहुण्यांच्या स्वागतासाठी शहर सजले आहे. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरीत सकाळी 10.30 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून याप्रसंगी प्रसिद्ध कोंकणी साहित्यिक दामोदर मावजो यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
उदगीर येथे 22 ते 24 एप्रिल असे तीन दिवस मराठी साहित्याचा जागर होणार आहे. संमेलनासाठी येणारे साहित्यिक, निमंत्रित पाहुण्यांच्या स्वागतासाठी उदयगिरीचा मुलुख सज्ज झाला आहे. शहरातील चौकाचौकात कमानी उभारण्यात आल्या आहेत. संमेलनस्थळाकडे येणाऱया रस्त्यांवर साहित्यिकांच्या स्वागताचे फलक लागले आहेत. संमेलनाचा प्रारंभ सकाळी 8 वाजता ग्रंथदिंडीने होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ही दिंडी काढण्यात येणार आहे.
साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्याचा प्रघात आहे. यंदाची ग्रंथदिंडी तीन वैशिष्टय़ांच्या पालखीतून मिरवणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या सीमांना एकसंध करणारी ही ग्रंथदिंडी महिलांच्या नेतृत्वातील वाहन पथकाने नेतृत्व करणार आहे. यात 11 महिला बुलेटधारी असून स्कूटी पथकासोबतच घोडेस्कारी पथकातही महिलांचेच वर्चस्व राहणार आहे.
कर्नाटकात विवाहविधीपूर्वी करण्यात येणाऱया ‘गुगलविधी’ या दिंडीत प्रथमच बघायला मिळणार आहे. मराठी भाषेतील नवरसांची समृद्धी दाखवणारी नवरंग दिंडी हे आणखी एक दिंडीचे वैशिष्टय़. यात 500 शालेय किद्यार्थी नऊ रंगांच्या टोप्यांसह सहभागी होणार आहेत. याशिवाय ढोल, लेझीमसह वासुदेव, गोंधळी आणि अन्य लोककला सादर करणारे 150 कलावंतही ग्रंथदिंडीत सहभागी होणार आहेत.