मुंबई | ठाकरे सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यात कमी पडत असल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यातच दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इतर मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत अव्वल ठरले आहेत. देशातील १३ राज्यांमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नंबर वन ठरले आहे. द प्रिंटने त्याबाबत बातमी दिली आहे. त्यावरून आता भाजपाने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यास सुरवात केली आहे.
उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असतील तर, वाझे हे टॉलस्टॉय आणि राहुल गांधी आजच्या युगातले तेनाली रामन असावेत, असा जोरदार टोला अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला लगावला आहे. तर दुसरीकडे ‘आमच्या वर्गात एक मुलगा होता, तो अभ्यास करायचा नाही, पण तो वर्गात नंबर वन यायचा. एकतर तो खूप हुशार असेल किंवा मग कॉपी करुन किंवा मॅनेज करुन पास झाला असेल, असंच मुंख्यमंत्र्यांचं आहे’, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे.
उठ-सूट सरकारवर टीका करणाऱ्या भाजपला या बातमीने आनंद होणार नाही, पण त्यांनी दुःख वाटून घेऊ नये. विशेषत: ज्या उत्तर प्रदेश सरकारचं भाजपकडून नेहमी गुणगान केलं जातं तेथील मुख्यमंत्र्यांचा या सर्वेक्षणात तब्बल पाचवा क्रमांक आहे, हे त्यांनी विसरु नये!, असं म्हणत रोहित पवार यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे.