वाझे प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती, या भेटीवर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.
भारतीय जनता पक्षाचं हायकमांड दिल्लीत आहे. ज्या पक्षाचे नेते दिल्लीत असतात, त्या पक्षाच्या लोकांना दिल्लीत जाऊनच त्यांना भेटावे लागते. उद्या मुख्यमंत्री ठाकरे हे पंतप्रधान होऊन दिल्लीत गेले तर आम्हालाही त्यांना भेटण्यासाठी तिथे जावे लागेल, असा खोचक टोला राऊतांनी फडणवीसांच्या शाह भेटीवर लगावला होता. ते आज नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
वाझे प्रकरणी राऊत यांना विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, एटीएस सक्षम असताना राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे. NIA ‘ला आणण्याची घाई करायला नको होती. NIA कडे तपास गेल्यामुळं राज्य सरकारला धक्का वगैरे बसलेला नाही. त्यांना जो तपास करायचा आहे तो करू द्या. कोणीही आलं आणि कोणत्याही पद्धतीनं तपास केला तरी सत्य बाहेर येईलच. महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत, असे विधान त्यांनी यावेळी केले होते.