रायगड | भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कारवर खार पोलीस ठाण्याबाहेर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याचं शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी समर्थन केलं आहे. सोमय्या काय त्या कारमध्ये जर मोदी जरी असते तरी शिवसैनिकांनी कार फोडली असती असं विधान दिपाली सय्यद यांनी यावेळी केलं. त्या खोपोली येथे एका कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होत्या.
दिपाली सय्यद म्हणाल्या की, “जेव्हा ही घटना घडली त्या परिस्थितीवेळी प्रत्येक शिवसैनिक रस्त्यावर होता आणि हे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. बाळासाहेबांची शिकवण आहे जो नडला त्याला फोडला. जर तिथं त्या कारमध्ये जर मोदीही असले असते ना तर त्या कारला तसंच फोडलं असतं. तुम्ही तिथं जाणार या सगळ्या गोष्टी घडणार पण तुम्ही हे केलंच कशाला?”, असं दिपाली सय्यद म्हणाल्या आहेत.
खासदार नवनीत राणा यांनी पोलीस कोठडीत हीन वागणूक दिली जात असल्याच्या आरोपावरही दिपाली सय्यद यांनी भाष्य केलं. “न्यायालयीन कोठडीमध्ये तुम्हाला काय फाइव्ह स्टोर हॉटेलची ट्रीटमेंट मिळत नाही हे त्यांनी आधी समजून घ्यायला पाहिजे. तुमच्यावर गुन्हा दाखल आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजद्रोही गुन्हा दाखल आहे. तुम्हाला तिथं नेलं आहे आणि तुम्ही म्हणत असाल मला फाइव्ह स्टारची थाळी आणून द्या. मला गुलाबजाम खायला घाला, तर तसं होत नाही. जी बाकीच्या लोकांना केली जाते तिच शिक्षा तुम्हालाही केली गेलीय”, असं दिपाली सय्यद म्हणाल्या.