राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात.त्यातच आता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे, ज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच याच विधावरून त्यांच्यावर अनेक राजकीय नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत यावरच आता मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे.
या संदर्भात अमोल मिटकरींनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’राज्यपाल महोदय महाराष्ट्राची माफी मागा. तुम्ही व तुमच्या जवळ रात्रंदिवस चहा प्यायला बसणाऱ्या तुमच्या “चहा” छाप सैनिकांनी जो वेळोवेळी “छत्रपती शिवाजी महाराजांचा” अपमान चालवलाय ते महाराष्ट्र कधीच खपवुन घेणार नाही. माफी मागा’, असे मिटकरी म्हणाले आहेत.
दरम्यान, पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राज्यपालांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे. तसेच आंदोलनाचा इशाराही दिला आहे. यासंदर्भात प्रशांत जगताप यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सोमवारी (२८ फेब्रुवारी २०२२) सकाळी १०.३० वाजता पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन करण्यात येईल.