मुंबई | शिवसेने नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रात देशातील बड्या नेत्यांच्या सुरक्षेवरुन वक्तव्य करुन केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर भाजपकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
भाजप उप प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत राज्यातील समस्यांवर आपल्या दिव्य ज्ञानाचा प्रकाश टाकावा असा टोला लगावला आहे तर राष्ट्राची चिंता करण्यासाठी मोदी सक्षम असून राज्याची चिंता करा असं खोचक विधान चित्रा वाघ यांनी केलं आहे. तसेच राज्यातील मुख्यमंत्र्यांची सुरक्षा काढून आदर्श दाखवून द्या असे आवाहनच चित्रा वाघ यांनी केलं आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. सर्वोच्च ज्ञानी आणि सोनिया सेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आपल्या सवयीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री आणि देशातील इतर नेत्यांना पुरवण्यात आलेली सुरक्षा अनाठी आहे असा जावाईशोध लावला आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर पंतप्रधान मोदी परखड भूमिका घेत असतात अशावेळी त्यांची सुरक्षा ही राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असतो. हे आपल्याला कितपत व कसे समजेल हे मला सांगता येणार नाही. कारण हा विषय खूप मोठा आहे. तरीही आपण जे म्हणत आहात की, नेत्यांच्या सुरक्षेवरती पैसे खर्च होत आहेत ते अनाठायी आहेत. तर याची सुरुवात आपल्या घरापासून केली तर काय हरकत आहे.