शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या सर्व विभागप्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी पार पडली होती. या बैठकीत येणाऱ्या सर्व मनपा निवडणुका संदर्भात पक्षप्रमुखांनी कानमंत्र दिला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भारीत्या जनता पक्षावर घणाघाती टीका केली होती.
बाबरी मशिद प्रकरणावेळी सर्वसामान्यांचे प्राण वाचवण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरली होती. आता भाजपावाले पैसे गोळा करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत अशा शब्दांत पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी भाजपावर जोरदार निशाणा साधला होता. तसेच भविष्यात शिवसेना देशाचे नेतृत्व करेल असे सुद्धा त्यांनी बोलून दाखविले होते.
पुढे राम मंदिरासाठी गोळा करण्यात येणाऱ्या देणगीवर ते म्हणाले की, रामाच्या नावाने काही लोक घरोघरी पैसे मागण्यासाठी जात आहेत. पण आपल्याला तसे करायचे नाही. बाबरी मशिद प्रकरणात शिवसेना रस्त्यावर उतरली होती. आता भाजप पैसे गोळा करण्यासाठी रस्त्यावर आले आहेत. देखो ये काम ना करो, राम का नाम बदनाम ना करो, असे म्हणत उद्धव यांनी भाजपला चांगलेच फैलावर घेतले होते.