ब्रूक फार्माच्या मालकाला चौकशीसाठी बोलावल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड पोलीस स्थानकात पोचले होते. तसेच या चौकशीवर त्यांनी आक्षेप घेतला होता. त्याठिकाणी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता याच मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले होते.
याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवारांनी देवेंद्र फडवणीसांना टोला लगावला आहे. रोहित पवार म्हणाले कि, ब्रूक फार्मा कंपनीच्या कर्मचाऱ्याला रेमडेसीवीरचा काळाबाजार केल्यावरून वलसाड पोलिसांनी अटक केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. पण याच कंपनीच्या संचालकाला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं तेंव्हा त्यांना सोडवायला राज्याचे विरोधी पक्षनेते मध्यरात्री पोलीस ठाण्यात दाखल झाले.
आजवर जनतेच्या कल्याणासाठी भांडणारे विरोधी पक्षनेते राज्याने पाहिले. पण आज महाराष्ट्राची जनता अडचणीत असताना या जनतेच्या कल्याणासाठी भांडण्याऐवजी काळाबाजार करणाऱ्या कंपनीसाठी भांडणारे विरोधी पक्षनेते राज्याला पहायला मिळतायेत, हे खेदजनक आहे, अशी खंत रोहित पवारांनी व्यक्त केली आहे.