मुंबई | कोरोनच्या पार्श्वभूमीवर मागच्या वर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाइन पद्धतीने पार पडला होता. मात्र सध्या कोरोनाचा धोका कमी होत असताना आता
शिवसेनेचा हा दसरा मेळावा यावेळी कोरोनाचे नियम पाळून होणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. यंदा ऑनलाईन पद्धतीने मेळावा होणार नसून, प्रत्यक्ष मेळावा घेण्यावर चर्चा सुरू आहे. याबाबत अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे घेतील, असंही राऊत म्हणालेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा २०२० चा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये न घेता छत्रपती शिवाजी महाराज पार्कासमोरील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात घेण्यात आला. कोरोनाचे नियम पाळून केवळ ५० जणांच्या उपस्थितीत हा मेळावा घेण्यात आला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईनने शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. मात्र, यावेळी हा मेळावा जाहीर होणार आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. त्याबाबत तयारी सुरु आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याची सूत्रे हातात घेतल्यानंतरचा शिवसेनेचापहिलाच दसरा मेळावा हा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला. मात्र, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे निर्बंधात शिथिलता आणली गेली आहे. ‘मिशन बिगेन’ अंतर्गत अनेक गोष्टींवरील बंधने शिथिल करण्यता आली असली तरी सार्वजनिक कार्यक्रमांवर काही निर्बंध आहेत. त्यामुळे सण-उत्सव साजरे करण्यावर अजूनही बंधने कायम आहेत. त्यामुळेच शिवसेनेचा दसरा मेळावा कसा होणार याची उत्सुकता आहे.