कोल्हापूर | मराठा आरक्षणाच्या मुद्धयांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना आज खासदार छत्रपती संभाजीराजेंनी आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनाला कोल्हापुरातील आजी-माजी मंत्री, खासदार आणि आमदार सामील झाले होते. तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सुद्धा सामील झाले होते. तसेच विविध मराठा संघटना सुद्धा सामील झाल्या होत्या.
यावेळी पत्रकार माध्यमाशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ज्या समाजाने लढा दिला नाही, त्यांच्या हातात शिवाजी महाराजांनी तलवार दिली, स्वाभिमानाने लढा देण्याचं शिकवलं. आज मराठा समाजाचे आंदोलन होत आहे. मराठा समाजासाठी हा स्वाभिमानाचा लढा आहे,” असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते या मोर्चात सामील होण्यासाठी मंगळवारी कोल्हापुरात दाखल झाले होते.
“मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत आणि आधीच्या सरकारने दिलेल्या सर्व सवलती पुन्हा मिळेपर्यंत होणाऱ्या सर्व आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे,” असं यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले होते. तर महाराष्ट्रातील सर्व ४८ खासदार आणि सर्व आमदारांनी एकत्र यावं आणि केंद्राला विशेष अधिवेशन घेण्यासाठी भाग पाडावं. मराठा आरक्षणासाठी मी लोकसभेत आवाज उठवेन, पंतप्रधान, राष्ट्रपतींनाही भेटेन, असे खासदार धैर्यशील माने यांनी बोलून दाखविले होते.