शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पश्चिम बंगालमध्ये घवघवीत यश मिळवलेल्या तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची तुलना थेट सामना अग्रलेखात देवी अहिल्याबाई होळकर यांच्याशी केली होती. आता या वरून नवा वाद होण्याचे चिन्ह दिसून येत आहे. राऊतांच्या या वक्तव्यावरून भाजपा नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊत यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे.
या संदर्भात गोपीचंद पडकरांनी ट्विट करून टीका केली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, ह्या हुजऱ्याने आमच्या बहुजनांच्या प्रेरणास्त्रोत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तुलना ममता बॅनर्जी सोबत केलीये. #किंबहुना उद्या हे #भाजपा सोबत दगाफटक्याने स्थान ग्रहण करणाऱ्या ‘#मामु’ची तुलना ‘सुर्याजी पिसाळ’ सोबत करतीलच… वहिनी ह्यांच्याकडं लक्ष ठेवा! असा टोला त्यांनी लगावला आहे.
काय म्हंटलं आहे सामना अग्रलेखात !
देशात मोदींची लाट ओसरली आहे व अमित शहा यांनी शर्थ करूनही त्यांना प. बंगालात मोठा विजय मिळवता आलेला नाही, हे या निवडणुकांनी दाखवून दिले. ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला नाहीतर आभाळ कोसळेल, असे वातावरण देशात निर्माण केले गेले. पण शेवटी ममता बॅनर्जींकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते. जे नव्हते तेच बाईंनी पणाला लावले. या लढ्याची तुलना अहिल्याबाई होळकरांच्या लढ्याशीच करावी लागेल.
होळकरांच्या गादीला वारस नसल्याने स्वतः अहिल्याबाईंनी राजशकट हाती घेतले. ही विधवा बाई काय राज्य करणार? अशी दरबारी मंडळींची अटकळ होती. त्यांचे दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड ऊर्फ गंगोबा तात्या हा त्या दरबाऱ्यांचा प्रमुख होता. अहिल्याबाईंना हटविण्यासाठी त्याने राघोबा दादांशी संधान बांधले आणि इंदूर बळकावण्यासाठी फूस लावली. राघोबा दादा मोठे सैन्य घेऊन इंदूरवर चालून आले.