मुंबई | भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काल पुणे महापालिकेला भेट दिली. याठिकाणीच काही दिवसांपूर्वी सोमय्या पायरीवर पडले होते. काल याचठिकाणी पुणे भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. मात्र यानंतर पुणे शहर काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही जागा गोमूत्र शिंपडून स्वच्छ केली. आता यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी कॉंग्रेसला टोला लगावला आहे.
भातखळकर आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत की “किरीट सोमय्या यांचा ज्या पायरीवर सत्कार झाला त्या पायरीचे काँग्रेसने गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केले. त्यानिमित्ताने काँग्रेसला गोमूत्र पवित्र आहे याची जाणीव झाली. हे किरीट सोमय्या यांच्या लढ्याचे यश आहे. बाकी ED ची कारवाई कशानेच थांबणारी नाही”, असे ट्वीट करत अतुल भातखळकरांनी कॉंग्रेसला टोला लगावला आहे.
दरम्यान पुण्यातील जंबो कोविड रुग्णालयात संजय राऊत आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी घोटाळा केल्याचा आरोप करत किरीट सोमय्या काही दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देण्यासाठी गेले होते. मात्र यावेळी त्यांच्यावर शिवसैनिकांकडून धक्काबुक्की करण्यात आली होती.