मुंबई | : विधानसभा अध्यक्ष भास्कर जाधव यांनी काल भाजपाच्या १२ आमदारांचं वर्षभरासाठी निलंबन केलं. त्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी समर्थन केलं आहे. काल सरकारची वेगळ्या प्रकारे कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू होता. पण विरोधकांचं केलं तुका झालं माका असं झालं. ते आमच्यावर बॉम्ब टाकणार होते. पण बॉम्ब त्यांच्या हातातच फुटला, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
ते आज मुंबईत पत्रकार माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. काल सरकारची कोंडी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न होता. वेगळ्या प्रकारे कोंडी करणार होते. पण मराठीत एक म्हण आहे. केले तुका झाले माका, अशी कोकणात म्हण आहे. ते आमच्यावर बॉम्ब टाकणार होते. त्यांच्या हातात बॉम्ब होता. बरं का. पण बॉम्ब त्यांच्या हातातच फुटला. एक चूक किती महागात पडू शकते हे त्यांच्या लक्षात आलं असेल, असं राऊत म्हणाले.
१२ आमदारांना का निलंबित केलं? त्यांचं जे वर्तन होतं ते तुम्ही पाहिलं असेल. मी तर सभागृहात नव्हतो. पण विरोधक कशाप्रकारे वागले हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. ते वेलमध्ये गेले. भास्कर जाधव तालिका समितीचे अधक्ष आहेत. त्यांना विरोधकांनी शिवीगाळ केली. धक्काबुक्की केली, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळेच निलंबन केलं. नाही तर महाराष्ट्राच्या विधानसभेत दंगली होतील.
पाकिस्तानच्या संसदेत, यूपी आणि बिहारमध्ये आपण सभागृहात दंगली होताना पाहिल्या आहेत. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधी घडलं नाही. महाराष्ट्रात ही परंपरा होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला असेल. अशा प्रकारचं वर्तन होऊ नये म्हणून हा कठोर निर्णय घेतला असेल, असंही राऊत यांनी स्पष्ठ केलं.