पश्चिम बंगालमध्ये वाहत असलेल्या निवडणुकीच्या वाऱ्यामुळे तेथील स्थानीक वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यात निवडणुकीच्या प्रचाराला खुद्द पंतप्रधान मैदानात उतरले आहे. याच मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
आंबेडकर म्हणाले की, मागच्या सत्तर वर्षांत जितके पंतप्रधान झाले ते राज्यांच्या निवडणुकीत एक ते दोन वेळा प्रचारासाठी जात पण आता पंतप्रधान ज्या पद्धतीने प्रचार करत आहेत ते पाहता असे वाटतं की, हे पंतप्रधान नाहीत तर एखाद्या गावचे प्रमुख आहेत.
पंतप्रधानांच्या वागण्यामुळे पश्चिम बंगालच्या निवडणुकीत जे लहान मोठे पक्ष निवडणूक प्रचार करत आहेत. तेही सर्व मोदींवर बोलत आहेत. त्यामुळं पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचला असल्याचेही आंबेडकर यांनी म्हणाले आहे. ते आज सोलापूर येथे दौऱ्यावर आलेले असताना बोलत होते.
आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिष्ठेची बनली असताना वंचित बहुजन आघाडीनेही कंबर कसली आहे. या पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार दिला जाणार असल्याचे यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.