जळगाव | ‘आम्ही पुढारी लोक इतके लाख लोक आमच्या सभेत होते, इतक्या लाखांची आमची सभा झाली व तसे आम्ही पेपरला छापूनही आणतो मात्र प्रत्यक्षात पाच ते सात हजार लोक सभेत असतात’ अशी जाहीर कबुलीच माजी मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी दिली आहे.
त्यामुळे त्यांच्या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे.
जळगाव येथे होमिओपॅथी संघटनेच्या वतीने कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला माजी मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या डॉक्टरांच्या संख्येवरून बोलताना गिरीश महाजनांनी ‘अंदर की बात’ जाहीर करून टाकली. ‘आम्ही पुढारी लोक इतके लाख लोक आमच्या सभेत होते, इतक्या लाखांची आमची सभा झाली असं सांगत असतो आणि हीच संख्या आम्ही पेपरला छापूनही आणतो मात्र प्रत्यक्षात पाच ते सात हजार लोक सभेत असतात, असं वक्तव्यच महाजन यांनी केलं.
तसंच, ‘राज ठाकरे यासंदर्भात बोलल्यानंतरच आपल्याला कळेल, त्यांच्या मनात काय आहे आणि ते काय बोलणार आहेत, हे आम्ही सांगू शकत नाहीत. पण ‘वेळ जवळच आहे, आता काही फार दिवस नाहीत’, बघूया, असं म्हणत भाजप नेते गिरीश महाजनांनी मनसे सोबतच्या युतीचे संकेत दिले.