एसटीच्या संतप्त आंदोलकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी हल्ला केला. या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या हल्ल्यासाठी गुणरत्न सदावर्ते आणि भाजपा जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनीही या हल्ल्याची चौकशी करावी. अशाप्रकारे हल्ला होणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसरीकडे हा हल्ला भाजपा पुरस्कृत असल्याचा आरोप करण्यात आला होता या आरोपांना आता भाजपाने प्रतेउत्तर दिले आहे.
भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या घरावर जो हल्ला झाला तो दुर्देवीच आहे. या प्रकारामागे कोण हे पोलीस शोधून काढतीलच. ज्येष्ठ नेत्याच्या घरावर हल्ला करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असे सांगत अचानक अनेकांना महाराष्ट्राच्या संस्कृतीचे उमाळे दाटून आलेत. खरं आहे नेत्यांच्या घरावर आंदोलन करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नक्कीच नाही पण याची सुरूवातच काँग्रेस नेत्यांनी केली.
भाजपा नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करणारे कोण होते? एखाद्या मंत्र्याच्या विरोधात कोणी फेसबुक पोस्ट केली म्हणून मंत्र्याच्या बंगल्यावर नेऊन त्याला मारहाण करणे. पोलिसाला मारहाण केली म्हणून न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलेल्या व्यक्तीला मंत्रिपदी कायम ठेवणे. दाऊदशी संबंधित गुन्हेगारांशी आर्थिक व्यवहाराच्या आरोपामुळे अटक होऊन तुरुंगात असलेला नेता मंत्रिपदी कायम ठेवणे. मंत्र्याने पोलिसांना बोलावून महिना शंभर कोटींच्या खंडणी वसुलीचा आदेश देणे. काळ्या पैशावर कारवाई म्हणून ज्याची संपत्ती जप्त झाली त्याचे वाजतगाजत स्वागत करून मिरवणूक काढणे. राज्यपालांना सरकारी विमानातून उतरवणे याचा उल्लेख करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.