राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा तापत असताना विरोधकांकडून ठाकरे सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. आता पुन्हा एकदा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. ठाकरे सरकारने जेवढी ताकद आम्ही अजित पवारांसोबत सरकार स्थापन केल्यानंतर कोर्टात लावली, तेव्हढी ताकद मराठा आरक्षणासाठी लावली नाही, अशी विचारणा पाटील यांनी केली आहे. ते सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर इथे बोलत होते.
मराठा आरक्षणाकडे ठाकरे सरकारने दुर्लक्ष केलं. आम्ही अजित पवारांसोबत सरकार स्थापन केल्यानंतर न्यायालयात मोठी ताकद लावली तितकी सुद्धा इथे लावली नाही. अभ्यासासाठी तज्ज्ञांची गरज भासते, या विषयात चालढकल चालली आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर करत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारला कैचीत पकडण्याचा प्रयत्न पाटील यांनी केला होता.
राष्ट्रवादीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना 1 कोटी पत्र लिहिण्याचा उपक्रम घेतलाय, किती हा मूर्खपणा चाललाय?. शरद पवारांनी १ कोटी पत्र उद्धव ठाकरेंना लिहायला सांगायला पाहिजेत, कदाचित पत्ता चुकला असावा, म्हणून मोदींना पत्र लिहिली जात आहेत, असा घणाघात टीका चंद्रकांत पाटलांनी केला आहे.