नवी दिल्ली: मागच्या काही महिन्यापासून राज्यातील आघाडी सरकार कोसळेल असे विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारतीय जनता पक्षातील अनेक नेते करत होते. तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत सर्वच जणांनी लवकरच महाराष्ट्रातील आघाडी सरकार कोसळेल असा दावा केला होता. त्या पाठोपाठ आता भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ठाकरे सरकारबाबत मोठं विधान केले आहे.
अमित शहा यांनी प्रसिद्ध मुलाखतीती ठाकरे सरकार बसेल असे भाष्य केले आहे. त्यात त्यांना राज्यातील ठाकरे सरकार किती दिवस चालेल असा सवाल करण्यात आला होता. त्यावर शहा यांनी थेट उत्तर दिलं. शिवसेनेने आमच्या सोबत निवडणूक लढवली होती. शिवसेना हा आमचा छोटा मित्र पक्ष होता. त्यांनी आम्हाला मुख्यमंत्रीपदावर दावा करण्याची मोकळीक दिली होती. हे सरकार त्यांच्या ओझ्यानेच कोसळेल, असा आमचा विश्वास आहे असं शहा म्हणाले.
दरम्यान, याच मुलाखतीत गृहमंत्री शहा यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी नुकत्याच झालेल्या बैठकीवर भाष्य करण्यास नकार दिला. शहा-पवार यांची नुकतीच भेट झाली होती. त्यावरून बरेच राजकीय तर्कवितर्क लढवले जात होते. त्याच भेटीचा तपशील सांगण्यास शहांनी नकार देऊन पुन्हा एकदा या भेटीचा सस्पेन्स वाढवला आहे.