मुंबई : राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा पुन्हा कडक लॉकडाऊन जाहीर होणार अशीच शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थांच्या परीक्षा होणार की नाही असाच प्रश्न आता पालक आणि विद्यार्थीवर्गाला सतावत आहे.
त्यात राज्यातील कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे दहावी आणि बारावीच्या मुलांना परीक्षा न घेताच उत्तीर्ण करावे, अशी मागणी आता पालक संघटनांकडून करण्यात येत आहे. या पालक संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून तशी विनंतीही केली आहे.
केंद्र सरकारने कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन दहावी आणि बारावीसह विद्यापीठांच्या परीक्षा या अंतर्गत मूल्यमापन करुन विद्यार्थ्यांना पास करण्याचे धोरण जाहीर करावे या संदर्भात इंडिया वाईड पॅरेंटस असोसिएशनने पंतप्रधान मोदींना हे पत्र पाठवले आहे.
काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर MPSC परीक्षा सुद्धा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर एप्रिलच्या अखेरीस सुरु होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांबाबतही प्रश्न विचारले जाऊ लागले होते. या परीक्षा रद्द झाल्या नाही तर किमान ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात, अशी मागणी अनेकांकडून करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी लवकरच याबाबत निर्णय जाहीर केला जाईल, असे म्हटले होते.