अमरावती येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांना न्यायालयाने एका जुन्या प्रकरणी शिक्षा सुनावली आहे. २०१३ साली शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर तहसीलदाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी तब्बल ७ वर्षांनंतर अमरावती अतिरिक्त सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे.
या निकालात आमदार देवेंद्र भुयार यांना ३ महिन्यांची शिक्षा आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणामुळे त्यांच्या मतदार संघात एकचं खळबळ माजली आहे. १५ मे २०१३ रोजी पंचायत समिती सदस्य असतांना देवेंद्र भुयार हे अमरावती जिल्ह्यातील वरुड तहसील कार्यालयात गेले होते. यात शासकीय ज्वारी खरेदी केंद्र उशीरा का होते तुम्ही माझा फोन कट का केला? असा दम देवेंद्र भुयार यांनी तत्कालीन तहसीलदार राम लंके यांना भरला होता. तसेच तहसीलदार लंके यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
या प्रकरणी तहसीलदार राम लंके यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार विविध कलमाअंतर्गत पोलिसांनी असा गुन्हा दाखल केला होता. यात दोषापत्र दाखल करण्यात आल्याने आणि यात गुन्हा सिद्ध झाल्याने अमरावती जिल्हा न्यायालयाने यात महत्त्वाचा निकाल देत देवेंद्र भुयार यांना ३ महिने सक्त मजूरी आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.