मुंबई | आज भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी आरक्षणावरून पुन्हा एकदा पवार कुटुंबियांवर निशाणा साधला आहे. बहुजनांनी यांना मुजरा करत दादा-साहेब-युवराज करत राहवं, म्हणजे तुमची जास्तीत जास्त जिल्हापरिषदेवर बोळवण होईल. हा डाव आपण ओळखला पाहिजे असं आमदार गोपीचंद पडळकरांनी सांगत अप्रत्यक्षपणे शरद पवार-अजित पवारांवर निशाणा साधला.
पडळकर म्हणाले की, पानिपतच्या पराभवानंतर स्वराज्याचा भगवा पताका थोरले सुभेदार मल्हाराव होळकर यांनी खांद्यावर पेलला. पानीपतच्या पराभवाचं रुपांतर त्यांनी प्रभावात केलं. मुघलशाही आपल्या टाचेखाली घेतली, जिथं ‘मल्हार आया भागो’ म्हणत मुघलांच्या सैनिकांची भंबेरी उडायची, ज्यांनी हिंदवी स्वराज्याची ताकद अटकपासून कटकपर्यंत पसरवली. प्रस्थापितांच्या दावणीला बांधलेल्या लेखकांनी होळकरांचा दैदिप्यमान इतिहास पुसायची मोहिम चालवली असा आरोप त्यांनी केला आहे.
पडळकर पुढे म्हणाले की, हा संघर्षाचा पराक्रमाचा इतिहास जर आम्हा बहुजन बांधवाना परत कळाला तर आम्ही इथली शासनकर्ती जमात होऊ, आम्ही आमचा राजकीय हक्क मागायला येऊ. ते येथल्या काका-पुतण्या धार्जिण्या राजकारण्यांना होऊ द्यायचं नाहीये. होळकरशाहीचे संस्थापक थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्व बहुजन धनगर भटक्या ओबीसी बांधवांनी आपला राजकीय न्युनगंड झुगारून आपला अधिकार घेण्याचा प्रण केला पाहिजे. मल्हारावांप्रमाणे मुत्सदीपणा शिकला पाहिजे असं आवाहन गोपीचंद पडळकरांनी बहुजनांना केले.