माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर शिवसेनेने अन्याय केला. भारतीय जनता पक्षाशी चर्चा केली असती, तर राजे भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आले असते. मात्र, ही राज्यसभा निवडणूक राजेंनी अपक्ष म्हणून लढविण्याचा निर्धार केला होता. शिवाय, शिवसेनेने राजेंना दिलेला शब्द पाळला नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि शिवसेनेने धोका दिल्यानेच आज राजेंना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत रामदास आठवले बोलत होते.
रामदास आठवले म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरु आहे. शिवसेना-काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यात अंतर्गत वाद आहेत. काँग्रेस पाठींबा ठेवायचा की नाही, यावर विचार करत आहे. काँग्रेसमध्ये धाडस दाखवत पाठिंबा काढावा. आम्ही राज्यात सरकार बनवू. काँग्रेस खिळखीळी झाली आहे. काँग्रेसला नेता राहिला नाही. कॉग्रेसला अध्यक्ष मिळेना. त्यामुळे नरेंद्र मोदी यांचा सामना करणे काँग्रेसच्या आवाक्यात नाही.
भोंग्याबाबत राज ठाकरे यांची भूमिका अयोग्य आहे. अजान आणि प्रार्थना झाल्या पाहिजेत. निवडणूक आल्या की असे जातीय राजकारण होते. हे थांबायला हवे. रिपब्लिकन ऐक्य होईल असे वाटत नाही. कोणाच्याही नेतृत्वात ऐक्य झालेच, तर माझा गट त्यात नक्की सहभागी होईल. याआधीही अनेकदा ऐक्याचा प्रयत्न झाला. मात्र, तो अयशस्वी राहिला आहे. समाजाने ऐक्य केले, तर आपण प्रत्येकाने एक पाऊल मागे येत त्यात सहभागी व्हायला हवे, असे त्यांनी नमूद केले.