मुंबई | युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना पुन्हा मायदेशी परत आणण्यासाठी केंद्राने ऑपरेशन गंगा सुरु केलं आहे. या ऑपरेशन गंगाच्या माध्यमातून आजतागायत बऱ्याच विद्यार्थ्यांना देशात परत आणण्यात यश आलं आहे. मात्र युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची संख्या त्यामानाने अद्यापही कमीच आहे. युक्रेनमध्ये अजूनही हजारो विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून मदतीची मागणी करत आहे.
दरम्यान, युक्रेनमध्ये रशियाने केलेल्या हल्ल्यात भारताच्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भारतीयांकडून संवेदना व्यक्त केल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील या घटनेवर संवेदना व्यक्त करत केंद्र सरकारला सल्ला दिला आहे. शरद पवार नेमकं काय म्हणाले? शरद पवार यांनी ट्विट करत युक्रेनच्या खार्कीव्ह शहरात रशियाच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या २१ वर्षीय नवीन शेखरप्पा याच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.
“युक्रेनच्या पूर्वेकडील खार्किव्ह शहरात गोळीबाराच्या हल्ल्यात आपला जीव गमावलेला आमचा भारतीय विद्यार्थी नवीन शेखरप्पा याच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना. आमचे हजारो विद्यार्थी अजूनही युक्रेनमध्ये कठोर हवामानात आणि अन्नाशिवाय अडकले आहेत. मी केंद्र सरकार आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांना विनंती करतो की त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य, या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची निराशा आणि चिंता समजून घ्या” असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे. तसेच अडकलेल्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने जलद गतीने पावलं टाकले पाहिजे”, असं शरद पवार ट्विटरवर म्हणाले आहेत.