एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे यासाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. मात्र पगारवाढीच्या मुद्दयावरून काही कारभारी कामावर परंतु लागले असून एसटी हळू-हळू पूर्वपदावर येताना दिसून येत आहे. मात्र काही ठिकाणी एसटी बसेसवर दगडफेकीचे प्रकार होताना आढळून आले आहे. एसटी बसेसवर होणाऱ्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर खटाव तालुका शिवसैनिकांच्या संरक्षणात पुसेगावातून पहिली एसटी रवाना करण्यात आली.
सातारा जिल्ह्यात एसटी बस रस्त्यावर धावू लागल्याने प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण असतानाच काही ठिकाणी एसटवर दगडफेक होण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. कालच पुसेगाव परिसरात एका बसवर दगडफेक करण्यात आली होती. आज बुधवारी सकाळी प्रताप जाधव, तालुकाप्रमुख दिनेश देवकर आणि सहकाऱ्यांनी ग्रामीण भागातील प्रवासाचे स्वस्त साधन असलेल्या एसटीला शिवसैनिकांचे संरक्षण देण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयाची त्वरित अंमलबजावणीही करण्यात आली. वडूज- पुसेगाव- फलटण या एसटीला शिवसैनिकांच्या संरक्षणात रवाना करण्यात आले. एसटीच्या पुढे आणि मागे शिवसैनिकांनी चारचाकी तसेच दुचाकीने प्रवास करुन संरक्षण दिले.