राज्यातील घोटाळेबाज मंत्रांची यादी वाढत जाणार आहे. या आठवड्यात १४ व्या मंत्र्यांचे घोटाळे मी बाहेर काढणार आहे. मंत्र्यांविरुद्ध तक्रार केल्यास ते गायब होतात किंवा ते हॉस्पिटलमध्ये दाखल होतात. काही दिवसांतच राज्य सरकारमधील सर्वच मंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल होतील की काय? असा प्रश्न भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला.
काल कोल्हापूरला निघालेले सोमय्या यांचे बाणेर येथे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी पुणे शहर भाजपा व प्रभाग क्र.९ च्या वतीने नगरसेविका स्वप्नाली-प्रल्हाद सायकर यांच्यातर्फे पगडी घालून व तलवार देऊन सोमय्या यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी सोमय्या भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी बोलत होते.
किरीट सोमय्या म्हणाले की, कोल्हापूरला माझ्या जीवाला धोका संभवतो, असे कारण सांगून जिल्हाबंदी करण्यात आली होती. परंतु, तरीदेखील मी मागे हटलो नाही व कोल्हापूरला जाण्याचा निर्णय घेतला. कलेक्टर साहेबांकडून माझी कोल्हापूर जिल्हाबंदी उठवण्यात आली आहे, असे सोमय्या यांनी सांगितले. कोल्हापुरात अंबाबाईचे दर्शन घेऊन मुरगूड पोलीस ठाण्यात मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध तिसरी तक्रार दाखल करणार आहे. या घोटाळ्याशी ठाकरे सरकारमधील १२ मंत्र्यांचा संबंध आहे. मात्र, त्यासंदर्भात आताच मी बोलणार नाही.