मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. तर दुसरीकडे मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. त्यात ऑक्सिजन अभावी अनेकांना आपला प्राण गमवावा लागत आहे, याच पार्श्वभूमीवर रुग्णांना ऑक्सिजन मिळवण्यासाठी मनपा प्रयत्न करत असल्याचे विधान महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.
आता त्या पाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा व्हावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मागच्या २४ तासात तीन वेळा संपर्क साधला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा उद्रेक आणि ऑक्सिजन तुटवड्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळेच महाराष्ट्राला १२०० ते १५०० मेट्रीक टन ऑक्सिजन मिळावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली होती.
शुक्रवारी मुंबईतील काही हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमरता होती. त्यामुळे काही रुग्णांना दुसरीकडे शिफ्ट करण्यात आले होते. त्यावरुनच उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना फोन करुन, महाराष्ट्रातील चिंताजनक परिस्थिती कळवली आहे. राज्यात ऑक्सिजनचा साठाही अत्यंत अपुरा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधांन नरेंद्र मोदी यांनाच फेसबुकवरून लष्कराच्या मदतीने हवाईमार्गे ऑक्सिजनचा साठा आणण्यास परवानगी द्यावी, असं आवाहन केलं होतं. यावर आता केंद्र सरकार काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.