राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात जोरदार इनकमिंग सुरु झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी कोकणातील भाजपच्या दोन नगरसेवकांनी सेनेत प्रवेश केला होता. आता त्या पाठोपाठ माहीम विधानसभा मतदार संघाचे आमदार लवकरच घरवापसी करणार आहे. सुरेश गंभीर हे लवकरच शिवसेनेत घरवापसी करणार असल्याचे समजते. त्यामुळे आता मुंबईत पालिका निवडणुकीच्यादृष्टीने फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
सुरेश गंभीर हे शिवसेनेचे माजी आमदार होते. २०१६ मध्ये त्यांनी शिवबंधन सोडून भाजपचे कमळ हातात घेतले होते. मात्र, बऱ्याच काळापासून त्यांना भाजपमध्ये महत्वाचे स्थान देण्यात आले नव्हते त्यामुळे ते भाजपवर नाराज होते. परिणामी ते भाजपमध्ये कधीच फारसे रमले नाहीत. सुरेश गंभीर यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
या भेटीमुळे सुरेश गंभीर आणि त्यांच्या दोन्ही कन्यांची शिवसेनेत घरवापसी होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. सुरेश गंभीर यांनी उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर यावर स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला. परंतु, मी मनाने अजूनही शिवसैनिक असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले. सुरेश गंभीर यांनी २०१६ साली शीतल आणि शामल या आपल्या दोन मुलींसह भाजपमध्ये प्रवेश केला होता.
सुरेश गंभीर हे शिवसेनेच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी एक आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात १९७८ साली ते माहीम परिसरातून पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. नंतरच्या काळात सुरेश गंभीर माहीम मतदासंघातून चारवेळा विधानसभेवर निवडून गेले होते.