पुणे | राज्यातील बहुजनांना एकत्रित करण्यासाठी, परंपरा जोपासण्यासाठी मल्हार महोत्सव २०२२ चं आयोजन करण्यात येत आहे. १५-१६ जानेवारीला पुण्यातील बालगंधर्व येथे मल्हार महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती भाजपा नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.
या संदर्भात बोलताना पडळकर म्हणाले की, पोतराज, गोंधळी, बहुरुपी, गजीनृत्य, दशावतारं, लावणी, नंदीबैल, कडक लक्ष्मी, वासुदेव या परंपरा आपण जतन करायला हवं. या महोत्सवात ज्यांनी ज्यांनी या क्षेत्रात योगदान दिले आहे त्यांच्या मुलाखती होणार आहेत. राज्यातील ज्यांनी या संस्कृतीचे जतन केले आहे.
तसेच आज अनेक गावगाड्याच्या लोककला आहेत. त्या लोप पावत चालल्या आहेत. गावगाड्याचा आत्मा आहे हा? या लोककलावंताना आम्ही या महोत्सवाद्वारे पाठबळ देणार आहोत. या कला जोपासणाऱ्या राज्यातील सर्व कलाकारासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करत आहोत. मल्हारी मार्तंड बहुसंख्य बहुजनांचे पालक आहेत. वर्षभरातून एकदा तरी सर्व समुदायातील लोकं इथं दर्शनासाठी येतात. यात कुठलेही राजकारण नाही. आम्ही एकत्र आले पाहिजे. संस्कृतीचं अदान-प्रदान झाले पाहिजे. संवाद झाला पाहिजे. हा महोत्सव आम्ही सण म्हणून साजरा करतोय. या महोत्सवाला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही असंही भाजपा आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.
दरम्यान, बहुजनांना एकत्रित करणं गरजेचे आहे. जे याआधी कोणी केले नाही. आपण कितीही मोठं झालो तरी आपलं मूळ विसरता कामा नये. प्रत्येक समाजाचं वेगळंपणे आहे. प्रस्थापित समाजातून या परंपरा बाजूला पडतायेत. महाराष्ट्रात अनेक जातीधर्म आहे. लोककला, पेहराव, राहणीमान वेगवेगळे आहे. आपण कुठल्या परंपरेतून पुढे आलोय हे नवीन पिढीला कळायला हवं. अनेक दुर्लक्षित समाज या महोत्सवाच्या माध्यमातून पुढे येतील. ज्यांना या लोकसंस्कृती जतन करायच्या आहेत. जातपात, पक्षीय मतभेद विसरुन सगळ्यांना हात जोडून विनंती आहे त्यांनी या महोत्सवाला यावं तुमचं स्वागत करतो अशी भूमिका आमदार गोपीचंद पडळकर यांनी मांडली आहे.