राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विविध मुद्द्यावरून विरोधकांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. अशातच मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता टिपू सुलतानच्या नावावर मुंबईतील मैदानाला नाव दिल्यामुळे राजकीय वादाला तोंड फुटलं आहे.
मुंबईतील मालाड येथील क्रीडा संकुलाचं उद्घाटन २६ जानेवारी रोजी काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते होणार आहे. मात्र या मैदानाला दिलेल्या नावावरून विश्व हिंदू परिषद आणि भाजपने संकुलाच्या उद्घाटनावर आक्षेप घेतला आहे.
त्यांचं असं म्हणणं आहे, की एखाद्या प्रकल्पाचं नाव “क्रूर हिंदूविरोधी” देणं निंदनीय बाब आहे तसेच दिलेल्या नावावरून नक्कीच आपल्या मुंबईची शांतता बिघडवण्याच्या उद्देशाने आहे आणि ते टाळता आलं असतं. आपला महाराष्ट्र ही संतभूमी आहे आणि एका प्रकल्पाला क्रूर, हिंदूविरोधी नाव देणं निंदनीय आहे, असं विहिंपचे प्रवक्ते श्रीराज नायर यांनी ट्विट केलं आहे.