पश्चिम बंगालमध्ये आता जोरदार निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यात आता तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे. काही दिवसांपूर्वी तृणमूलने कोरोना लसीच्या प्रमाणपत्रावर असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या फोटोला विरोध दर्शवत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.
त्यात आता तृणमूलच्या टीकेला भाजप नेत्यांनी सुद्धा सडेतोड उत्तर दिले आहे. त्यात एका जाहीर रैलीत मोदींचं तोंड बघायचे नाही आहे, अशी टीका ममतां दीदींनी केली होती. आता दीदींच्या या टीकेला उत्तर देताना भाजपा नेत्याने अजब वक्तव्य केले आहे. मोदी विरोधात बोलणे म्हणजे भारतमाते विरोधात बोलण्यासारखे आहे असे उत्तर भाजपा नेत्याने दिले आहे.
आम्हाला पंतप्रधान मोदींचं तोंडही बघायचं नाही, असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी प्रचारसभेत मोदींवर टीका केली होती. ममतांनी केलेल्या टीकेला पूर्वाश्रमीचे ममता बॅनर्जी यांचे सहकारी आणि भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
“तुम्हाला करोनाविरुद्ध पंतप्रधान मोदींची लस घ्यावी लागेल. ते (नरेंद्र मोदी) निवडून आलेले पंतप्रधान आहेत. त्यांच्याविरुद्ध बोलणं म्हणजे लोकशाहीविरुद्ध बोलणं आहे. त्यांच्याविरुद्ध बोलणं म्हणजे भारत मातेविरुद्ध बोलण्यासारखंच आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशकडे लस नाहीये. त्यामुळे तुम्हाला मोदींचीच लस घ्यावी लागणार आहे,” अशी टीका सुवेंदू अधिकारी यांनी ममतांवर केली.