मुंबई | नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारच्या १२ नेत्यांची यादी ‘डर्टी डझन’म्हणत ट्विटच्या माध्यमातून जाहीर केली. दरम्यान, यावर उत्तर देत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून आता तुमच्याही ‘डर्टी बारा’चे बारा वाजल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,’महाविकास आघाडीचे ‘डर्टी पाच डझन’ नेते तुरुंगात जाणार अशी घोषणा चंद्रकांत पाटील व किरीट सोमय्या करतात. म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून आणि वापरूनच हे करणार ना? मग तुमचे ‘डर्टी डझन’ त्या वेळेला काय सिमल्याच्या बर्फात स्वर्गसुखाचा आनंद घेत बसणार आहेत का? किरीट सोमय्या, नील सोमय्या, प्रसाद लाड, पुण्याचे मोहोळ, गिरीश महाजन, मुनगंटीवारांचा ‘झाड’ घोटाळा, अमोल काळे, विजय ढवंगाळे यांचा महापोर्टल आयटी घोटाळा, अगदी चंद्रकांत पाटलांनी सार्वजनिक बांधकाम, महसूलमंत्री म्हणून केलेले उद्योग कोणत्या ‘डर्टी डझन’मध्ये बसतात ते लवकरच कळेल. पोलीस भरती घोटाळाही रटरटून शिजलाच आहे. आता सुरुवात झालीच आहे तर तुमचेही ‘डर्टी बारा’चे बारा वाजल्याशिवाय राहणार नाहीत’, असे राऊत म्हणाले.
सोमय्यांनी जाहीर केलेल्या ‘डर्टी डझन’मध्ये अनिल देशमुख, नवाब मलिक, अनिल परब, संजय राऊत, सुजित पाटकर, भावना गवळी, आनंद आडसुळ, अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक, रविंद्र वायकर, जितेंद्र आव्हाड आदींचा समावेश आहे. तसेच मविआचे १२ नेते कारवाईच्या रांगेत आहेत. ते कितीवेळा दबाव आणणार? पत्रकाराने सकाळी विचारलं ‘अब किस की बारी है’ मी म्हटलं चिठ्ठी टाकावी लागेल. दोन गेले, १० जणांवर कारवाई सुरू आहे, असेही सोमय्या म्हणाले आहेत.