पुणे- पुण्यात स्मृती इराणींवर झालेला हल्ला हा भ्याड हल्ला होता असं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडलं आहे . राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते गृहमंत्री आपले आहेत अशा भावनेत रोज कायदा हातात घेऊन बेकायदेशीर कृत्य करतायत , सत्तापक्षाचे कार्यकर्ते अशा प्रकारचं कृत्य करू लागले तर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था नाही हे स्पष्ट दिसतंय , असं सांगत त्यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे . आम्हीही जशास तसं उत्तर देऊ शकतो पण आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आहोत , पोलिसांना कारवाईची संधी देत आहोत असेही त्यांनी सांगितले .
राज्यात दररोज सत्ताधाऱ्यांच्या कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या घटनांबाबत फडणवीसांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे . पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करावी , अन्यथा जशास तसे उत्तर देऊ , अशी आक्रमक भूमिका फडणवीसांनी मांडली आहे . स्मृती इराणींवर झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद दिल्ली दरबारीही उमटण्याची शक्यता आहे .
पुण्यात नेमकं काय घडलं .
पुण्यात स्मृती इराणी अमित शाहा यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या . त्या ज्या हटेलबाहेर थांबल्या होत्या , त्या हॉटेलच्या बाहेर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं . यावेळी काही काळ भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामनेही आले होते .