ईडीच्या आडून विरोधकांवर छापेमारी, कारवाईचा धडाका लावणाऱया केंद्रातील मोदी सरकारवर शुक्रवारी दिल्लीचे मुख्यमंत्री, ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी जोरदार निशाणा साधला. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्यानंतर शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांना खोटय़ा प्रकरणात अडकवून अटक करण्याचा मोदी सरकारचा डाव आहे, असा आरोप केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत केला.
केंद्र सरकार सत्येंद्र जैन यांना खोटय़ा प्रकरणात अडकवणार आहे, असे मी काही महिन्यांपूर्वी सर्वांना सांगितले होते. त्यांना अटक केल्यानंतर आता मनीष सिसोदिया यांना खोटय़ा प्रकरणात अडकवण्याची केंद्राची तयारी सुरू आहे. त्यासाठी सरकारने सर्व तपास यंत्रणांना काही खोटय़ा केसेस दाखल करण्यास सांगितले आहे, असा दावा केजरीवाल यांनी शुक्रवारी केला.
मनीष सिसोदिया हे कदाचित स्वतंत्र हिंदुस्थानचे सर्वोत्तम शिक्षणमंत्री आहेत. सत्येंद्र जैन, सिसोदिया यांना तुरुंगात पाठवून दिल्लीतील आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील चांगले काम रोखण्याचे केंद्र सरकारचे षड्यंत्र आहे. जैन, सिसोदिया यांना तुरुंगात पाठवण्यामागील राजकारण काय तेच कळत नाही. असले राजकारण देशासाठी केवळ धोका देणारे आहे, असेही केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले.
दिल्लीतील शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील कामांचा धडाका लक्षात घेत केंद्रातील मोदी सरकारने कारवाईचे षड्यंत्र रचले आहे. विकासकामे रोखण्यामागील केंद्राचे उद्दिष्ट समजण्यापलीकडील आहे, असा घणाघातही केजरीवाल यांनी मोदी सरकारवर केला. जैन, सिसोदिया यांना तुरुंगात पाठवण्याच्या कारस्थानामागील नेमके कारण काय? कुणी म्हणतेय आगामी हिमाचल प्रदेश निवडणूक, तर काहींच्या मते हा पंजाब निवडणुकीचा सूड आहे.