भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर खास त्यांच्या शैलीत निशाणा साधला. सचिन वाझे माफीचा साक्षीदार होणार यावरून किरीट सोमय्या यांना टोमणा मारलाय. “सचिन वाझे CBI चे माफीचे साक्षीदार होणार आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली. सोबतच अनिल देशमुख यांच्यासोबत अनिल परब यांची झोप उडाली असेल.”
“सचिन वाझे याने वसूल केलेले शंभर कोटी रुपये दापोलीच्या रिसॉर्टमध्ये खर्च केले, त्यामुळे आता अनिल देशमुख तर गेले. आता अनिल परब यांचं काय होणार?”, असं म्हणताना किरीट सोमय्या यांनी शोले चित्रपटातील डायलॉग मारला. “अब तेरा क्या होगा कालिया”, हा डायलॉग मारून किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांना उपरोधिक टोला लगावला आहे.
यावेळी बोलताना किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या घेतलेल्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंना इतकी भीती वाटते? की स्वतःच्या पक्षाचे आणि मित्र पक्षाचे आमदार विकाऊ आहेत? हे संजय राऊत आरोप करत आहेत. बेईमान कोण आहे, शिवसेनेचे आमदार की शिवसेनेचे नेते? अशी टीका देखील किरीट सोमय्या यांनी केली आहे.